Sunday, December 16, 2007

अजुन थोडे नमन ...

कापडावर डिझाईन छापणे -
कापडाला सुरकुत्या पडल्या असतील तर थोडी इस्री फिरवुन घ्यावी. डिझाईन कोठे छापायचे ते कापडावर मोजुन घ्यावे आणि त्याप्रमाणे पेन्सीलने खुणा करुन, आवश्यक असेल तर हलक्या हाताने रेघा मारुन घ्याव्यात. हे कापण एका टेबलवर किंवा फरशीवर नीट अंथरावे. त्यापूर्वी टेवल/फरशी स्वच्छ करुन घ्यावी अन्यथा कापडाला डाग पडु शकतात. आता डिझाईनचा कागद कापडावर ठेवुन तो कागद नीट ठेवुन कडेने गरज असेल टाचणी लावुन घ्यावी. कार्बनपेपरची एक बाजु साध्या कागदासारखी असते आणि दुसरी बाजु मऊ असते ह्या बाजुला हात लावला तर रंग हाताला लागतो. ही रंग लागणारी बाजु कापडावर येईल यापद्धतीने कार्बनपेपर डिझाईनच्या कागदाखाली ठेवावा. डिझाईन नीट हलक्या हाताने नीट जागी आहे ना ते पाहुन गरज असेल तर टाचण्यानी टाचुन घ्यावे. आणि पेन्सीलने नीट डिझाईनवर परत एकदा डिझाईन काढावे यामुळे ते डिझाईन कापडावर उमटेल. डिझाईन काढल्यावर साधारण ४-५ तास नीट वाळु द्यावे ज्यामुळे कार्बन भरतकाम करताना पसरत नाही. कार्बनचा रंग जरी दोरर्‍याला लागला तरी तो कपडा धुतल्यावर जातो म्हणुन घाबरण्याचे कारण नाही. काळ्या/निळ्या रंगाच्या कापडावर पांधरा/पिवळा कार्बनपेपर वापरावा. पांढर्‍या कापडावर पिवळा/ गुलाबी रंगाचा कार्बन वापरावा. निळा/काळा कार्बन आकाशी, राखाडी रंगाचे कार्बन पेपर वापरावेत.


कापडाला रिंग लावणे -
लहान रिंगचा आतला आणि बाहेरचा भाग वेगवेगळा करावा आणि आतला भाग कापडाच्या खाली आणि डिझाईन साधारण मधोमध येईल असा ठेवावा. आता रिंगचा बाहेरचा भाग थोडा सैल करुन (स्क्रु वापरुन) तो कापडावरुन आतल्या भागावर घट्ट बसवावा. आणि कापड बाहेरच्या बाजुला ताणुन त्याच्या सुरकुत्या काढुन घ्याव्यात. हे रिंग लावलेले कापड साधारण डफलीसारखे दिसते. आतले कापड व्यवस्थीत ताणालेले असावे म्हणजे केलेले भरतकाम सुबक दिसते. कापडाचा आणि दोर्‍याचा ताण नीट एकसारखा असेल तर रिंग काढल्यावर कापड आणि भरतकाम लोळागोळा न होता तसेच रहाते.

रेशीम लडीतुन सोडवुन वापरणे -
कापड साधे सुती असेल तर साधारण ६ पदरी दोर्‍यातले २ पदर वापरावेत. डिझाईन मोठे आणि बटबटीत असेल तर ४-६ पदरी वापरावेत. काही मध्यम आकाराच्या डिझईनना ३ पदरी रेशीम वापरता येते. पडदे, साड्या, बेडशीट, ड्रेस वगैरेसाठी रेशीम जास्त लागते अशावेळी लागणारे सर्व रेशीम एकदम आणुन ठेवावे कारण कंपनीने एखादा रंग discontinue केला तर काय करावे हा प्रश्न पडत नाही आणि एकेक लड संपल्यावर दुकानच्या फेर्‍या मारत बसावे लागत नाही. वापरत असणार्‍या सर्व रेशमांचे रंगांचे नंबर एका कागदावर टिपुन ठेवावेत म्हणजे एखदेवेळी लडीला लावलेले नंबर हरवले तर गडबड होत नाही.

लड करताना रेशमाचे एक टोक ओढले तर सहजी लडीतुन सोडवले जाईल असे ठेवलेले असते. ते टोक हलक्या हाताने लडीतुन ओढावे साधारण २ वेढे ओढले की पुरेश्या लांबीचे रेशीम लडीतुन सोडवले जाते. आता ते रेशीम लडीबरोबर कापुन घ्यावे. कापलेल्या रेशमाच्या तुकड्यातले २ पदर नीट सोडवुन घ्यावेत. आणि उरलेले ४ पदर नीट जपुन ठेवावेत. सोडवलेले २ पदर सुईमधे ओवुन २ पदरीच ठेवावेत. दोन्ही टोके एकमेकांना न जोडता एक रेशमाचे एक टोक सुटे ठेवुन दुसर्‍या टोकाला गाठ घालुन घ्यावी.

No comments: