Monday, December 31, 2007

नविन वर्ष कलेच्या आनंदाचे भरभराटीचे जावो!

Happy New Year 2008!
नविन वर्ष म्हणजे नविन संकल्प करण्याचे दिवस. तुम्हीपण काही संकल्प केले असतील किंवा संकल्प करायचेच नाहीत असे संकल्प केले असतील. जे काही असेल ते असेल! माझ्यातर्फे तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नव्या वर्षातले तुमचे सर्व संकल्प पुरे होवोत ही त्या विधात्याजवळ प्रार्थना. नविन वर्षात तुमच्या सर्व कलांना बहर येवो.

Saturday, December 29, 2007

फ्रेंच नॉट

डिझाईन म्हणुन साधे ठिपके काढायचे आहेत जसे की स्ट्रॉबेरीवरील ठिपके किंवा फुलातले परागकण. सुई एका ठिपक्यावर वर काढावी. परत त्याच ठिकाणी खाली घालावी आणि किंचीत अंतरावर (कापडाचे २ धागे इतकेच अंतर असावे) वर काढावी. सुई पूर्णपणे वर न काढता तशीच कापडात ठेवावी. मुख्य धाग्याने, म्हणजे जो धागा कापडातुन पूर्णपणे वर काढलेला आहे त्या धाग्याने सुईभोवती ४ ते ५ वेळा गुंडाळावेत. हे गुंडाळे घालताना खुप सैल नकोत. अता डाव्या हाताच्या आंगठ्याने हा गुंडाळलेला दोरा एकत्र दाबुन ठेवावा आणि सुई पूर्णपणे कापडातुन वर काढावी. डाव्या अंगठ्याने ते पिळे नीट एकेठिकाणी आहेत ना ते बघुन घ्यावे आणि नसतील तर नीट एकत्र करुन घ्यावेत. आता सुई परत कापडात खाली पूर्णपणे घालावी. हा झाला एक टाका. असे लागतील तितके ठिपके घालावेत.

French Knot 1

French Knot 2

French Knot 3

French Knot 4

French Knots


उपयोग - वर सांगीतल्याप्रमाणे, स्टॉबेरीवरचे ठिपके, फुलांमधले परागकण, माणसांचे व प्राण्यांचे डोळे यासाठी हा टाका मुख्यत्वेकरुन वापरला जातो.

Wednesday, December 26, 2007

फेदर स्टिच

एकेरी फेदर स्टिच

डिझाईनसाठी एक रेघ काढुन घ्या. आता रेघेच्या एका टोकाकडे सुई कापडातुन वर काढा. आता सुई रेघेच्या उजवीकडे आणि मूळ सुईपासुन थोडी वरच्या बाजुला कापडात घालुन सुईचे टोक रेघेवर काढा आणि दोरा सुईखाली राहील असा ठेवुन सुई ओढा. आता पुढचा टाका रेघेच्या डाव्या बाजुला आणि आधीच्या टाक्याच्यावर थोडी वर कापडात खाली घालुन रेघेवर काढावी आणि दोरा सुईखाली ठेवावा. असे एक टाका उजवीकडे एक टाका डावीकडे असे करत रेघ पूर्ण करावी.

Feather Stitch 1

Feather Stitch 2

Feather Stitch 3


उपयोग - हा टाका डेकोरेटीव्ह स्टीच म्हणुन उपयोग करु शकता. तसेच नाजुक घातला तर लहान लहान पानांसाठी पण वापरता येतो. खालील फोटोमध्ये पाने कशी करावीत ते दिले आहे.

Feather Stitch Leaf

Feather Stitch Leaves
दुहेरी फेदर स्टीच

हा टाका वरील प्रमाणेच घालायचा आहे फक्त एक बदल आहे तो म्हणजे उजवीकडे एका शेजारी २ आणि डावीकडे एकाशेजारी २ असे टाके घालत डिझाईन पूर्ण करायचे आहे.

Double Feather Stitch 1

Double Feather Stitch 2

Feather Stitch side by Side
उपयोग - ह्या टाक्याचा उपयोग पण डेकोरेटीव्ह स्टीच म्हणुन केला जातो. तसेच नाजुक जरा उन्च गवत वगैरे दाखवण्यासाठी केला जातो.

Tuesday, December 25, 2007

प्रोजेक्ट १ - टेबल मॅट

टेबल मॅट्स करायला अतिशय सोप्या असतात. बाहेर त्यासाठी अवाजवी किम्मत देण्याऐवजी घरातल्या घरात करुन पहायला हरकत नाही. तुमच्या गरजेप्रमाणे २,४ किंवा ६ चा सेट करु शकता. खाली दिलेले साहित्य ४ टेबलमॅटसाठी आहे. आपल्या गरजेप्रमाणे साहित्य कमी जास्त करावे लागेल.

साहित्य -
३६ पन्न्याचे १ मीटर कॉटनचे आपल्या आवडत्या रंगाचे कापड
डिझाईन शक्यतो लहान साधारण २" लांबी-रुंदीचे
कार्बन पेपर
डिझाईनच्या गरजेप्रमाणे रेशीम

एका तयार टेबलमॅटचे माप १३"x१८" चारही बाजुने दुमडण्यासाठी साधारण १/२" कापड जास्त घ्यावे. शिवण्याआधीचे माप १४"x१९" होईल. कापडावर याप्रमाणे मापे टाकुन टेबलमॅट आखुन घ्याव्यात. आता प्रत्येक मॅटच्या एका कोप~यात डिझाईन छापायचे आहे. त्यासाठी कडेपासुन २-२" जागा कडेने सोडुन त्याच्या आतील बाजुला डिझाईन छापायचे आहे. सोयीसाठी आकृती खाली देत आहे.

Table Mats Layout
टेबल मॅट

Monday, December 24, 2007

बटनहोल टाका

प्रकार-१

कापडावर एक खालीलप्रमाणे पान आणि फूल काढुन घ्या. आता प्रथम फूल भरायला घेउयात. बाहेरील रेघेवर एके ठिकाणी सुई कापडातुन वर काढा. आता फुलाच्या आतील बाजुला आणि सुईपासुन साधारण थोडे पुढे आणि रेघेच्या थोडे खाली अशी सुई कापडात घाला आणि ती फुलाच्या रेघेवर वरती काढा. हलक्या हाताने दोरा ओढा. दोरा जास्त ताणला गेला तर टाका नीट दिसत नाही आणि खुप सैल सोडला तर टाका खाली उतरतो.
Design

ButtonHole - 1


ButtonHole - 1 Continue


उपयोग - हा टाका घालण्यासाठी थोडा सराव हवा. मेपलच्या पानांच्या प्रमाणे असणा~या पानांसाठी हा टाका चांगला दिसतो. त्याच प्रमाणे मोठ्या दुरेघी पाकळ्या (खालील चित्र पहा), वर डिझाईन मधे दाखवल्यासारखी फुले, नाजुक परड्या विणण्यासाठी होतो.
ह्या टाक्याचा मुख्य उपयोग पॅचवर्कच्या कडा मुख्य कापडाला शिवण्यासाठी होतो. कसे ते आपण पुढे जेव्हा पॅचवर्क शिकु तेव्हा देईनच.

प्रकार - 2
ह्यासाठी वरील डिझाईनच्या फुलामधला गोल वापरायचा आहे. सुई गोलाच्या रेघेवर वर काढा. आता गोलाचा साधरण मध्य शोधुन तिथुन खाली घाला आणि प्रत रेघेवर आधीच्या टाक्याच्या शेजारी थोडे अंतर ठेवुन खली घाला अता पुढचा टाका वर घेताना गोलाच्या मध्यात जिथे सुई खाली घातली होती त्याचठिकाणी खाली घाला. असे करत पूर्ण गोल भरुन घ्या.
ButtonHole - 2

ButtonHole -2 Continue


उपयोग -ह्या टाक्याचा उपयोग मोठ्या फुलांचे गोलाकार मध्यभाग भरण्यासाठी आणि चेरीसारखी फळे भरण्यासाठी होतो.

Thursday, December 20, 2007

गहूटाका, साखळी वगैरे

गहुटाका -
गहुटाक्यासाठी कापडावर खालील प्रमाणे डिझाइन काढा. आता फुलाच्या पाकळिच्या आतील टोकावर सुई कापडातुन वर काढा. आता परत सुई जिथून वर काढली तिथेच खाली तोचा पण पूर्ण्पणे खाली घालू नका. त्याच पाकळीच्या बाहेरील टोकातून सुई कापडातुन वर काढून दोरयाने सुईखालुन वेढा घ्या आणि सुई पूर्ण्पणे कापडाबाहेर काढा. पण दोरा ओढुन ना घेता थोडा सैल ठेवून टाका गव्हासारखा टपोरा दिसेल असा सैल ठेवा. आणि सुई त्या वेढ्यापलिकडे कापडात पूर्णपणे कापडातुन खाली घाला आणि अशाच प्रकारे सगळे फूल पूर्ण करा.
Design1

Stitch1

Stitch2

Complete Flower

साखळी -
कापडावर एक सरळ रेघ डिझाइन म्हणून काढून घ्या. त्या रेघेच्या एका टोकातून सुई वर कढा आणि पहिला टाका गहुटाक्याप्रमाणे घालून घ्या. साखळीची दुसरीकडी म्हणजे पण एक गहुटाकच असतो पण शेवटी सुई कापडातुन खाली घालतो त्याऐवजी पुढचा गहुटाका घालत डिझाइन पूर्ण करायचे आहे आणि सगळ्यात शेवटी सुई कापडातुन खाली घालून गाठ घालायची आहे.


chain 1
chain 2


डबल साखळी -
कापडावर एक रेघ डिझाइन म्हणून काढून घ्या. साखळीचा पहिला टाका घालून घ्या. पुढचा टाका आता ह्या पहिल्या टाक्याच्या शेजारीच घालावायाचा आहे. त्यासाठी सुई परत पहिल्यMदा जिथे वर काढली होती त्याशेजारीच परत खाली तोचा आणि पहिल्या साखळीच्या शेजारी परत कापडातुन बाहेर काढा. आता परत सुईभोवती दोरयाचा वेढा घ्या. दोन गहुटाके शेजारी काढल्याप्रमाणे दिसेल. आता पुढचा टाका ह्या दुसर्या कडीच्या डोक्यावर घालून त्याशेजारचा पहलिया साखळीच्या डोक्यावर घालत घालत डिझाइन पूर्ण करायचे आहे.
Double Chain 1

Double Chain 2

नागमोडी साखळी -
यासाठी एक सरळ रेघ डिझाइन म्हणून काढून घ्या. आता साखळीचा पहिला टाका घालताना डिझाईन्च्या रेघेवार सुई वर ना काढता थोडी त्या रेघेच्या डाव्या बाजूला काढावी आणि नेहेमीप्रमाणे साखळिची कडी पूर्ण करावी. दुसरी कडी घालताना सुई रेघेच्या उजवीकडे काढून पूर्वीप्रमाणेच कडी पूर्ण करावी. असेच एकदा डाविकडे एकदा उजवीकडे करत नागमोडी साखळी पूर्ण करावी.

Zig Zag Chain

Monday, December 17, 2007

उलटी टीप (Stem Stitch)

कापडावर पेन्सीलने एक सरळ रेघ काढुन घ्या. आधी सांगितल्याप्रमाणे ही रेघ रिंगच्या मधोमध येईल अशी रिंग लावुन घ्या. सुईमध्ये २ पदरी रेशीम ओवुन घ्या. आता डिझाईनच्या एका टोकाला कापडातुन सुई वर काढा. सुई जिथुन वर काढली आहे त्याच्यापुढे साधारन ३-४ मिलिमीटर अंतरावर रेघेवर सुई कापडामधे खाली टोचा. सुई पूर्ण खाली न घालता ती कापडातुन मागच्या बाजुला खालील फोटो मधे दाखवल्याप्रमाणे वर काढा. पुढचा टाका असाच घालत पुढे जावा व राहीलेले डिझाईन पूर्ण करा.उपयोग -
या टाक्याचा उपयोग फुला-पानांचे देठ, डिझाईनच्या आउटलाईन्स करण्यासाठी होतो.

Variation -

एका रंगाने उलटी टीप घालुन त्यावर दुसर्‍या रंगाने त्या घातलेल्या टाक्यांवर वरच्यावर पीळ घालणे.
इथे पहा : http://www.embroiderersguild.com/stitch/stitches/stem.html

Sunday, December 16, 2007

अजुन थोडे नमन ...

कापडावर डिझाईन छापणे -
कापडाला सुरकुत्या पडल्या असतील तर थोडी इस्री फिरवुन घ्यावी. डिझाईन कोठे छापायचे ते कापडावर मोजुन घ्यावे आणि त्याप्रमाणे पेन्सीलने खुणा करुन, आवश्यक असेल तर हलक्या हाताने रेघा मारुन घ्याव्यात. हे कापण एका टेबलवर किंवा फरशीवर नीट अंथरावे. त्यापूर्वी टेवल/फरशी स्वच्छ करुन घ्यावी अन्यथा कापडाला डाग पडु शकतात. आता डिझाईनचा कागद कापडावर ठेवुन तो कागद नीट ठेवुन कडेने गरज असेल टाचणी लावुन घ्यावी. कार्बनपेपरची एक बाजु साध्या कागदासारखी असते आणि दुसरी बाजु मऊ असते ह्या बाजुला हात लावला तर रंग हाताला लागतो. ही रंग लागणारी बाजु कापडावर येईल यापद्धतीने कार्बनपेपर डिझाईनच्या कागदाखाली ठेवावा. डिझाईन नीट हलक्या हाताने नीट जागी आहे ना ते पाहुन गरज असेल तर टाचण्यानी टाचुन घ्यावे. आणि पेन्सीलने नीट डिझाईनवर परत एकदा डिझाईन काढावे यामुळे ते डिझाईन कापडावर उमटेल. डिझाईन काढल्यावर साधारण ४-५ तास नीट वाळु द्यावे ज्यामुळे कार्बन भरतकाम करताना पसरत नाही. कार्बनचा रंग जरी दोरर्‍याला लागला तरी तो कपडा धुतल्यावर जातो म्हणुन घाबरण्याचे कारण नाही. काळ्या/निळ्या रंगाच्या कापडावर पांधरा/पिवळा कार्बनपेपर वापरावा. पांढर्‍या कापडावर पिवळा/ गुलाबी रंगाचा कार्बन वापरावा. निळा/काळा कार्बन आकाशी, राखाडी रंगाचे कार्बन पेपर वापरावेत.


कापडाला रिंग लावणे -
लहान रिंगचा आतला आणि बाहेरचा भाग वेगवेगळा करावा आणि आतला भाग कापडाच्या खाली आणि डिझाईन साधारण मधोमध येईल असा ठेवावा. आता रिंगचा बाहेरचा भाग थोडा सैल करुन (स्क्रु वापरुन) तो कापडावरुन आतल्या भागावर घट्ट बसवावा. आणि कापड बाहेरच्या बाजुला ताणुन त्याच्या सुरकुत्या काढुन घ्याव्यात. हे रिंग लावलेले कापड साधारण डफलीसारखे दिसते. आतले कापड व्यवस्थीत ताणालेले असावे म्हणजे केलेले भरतकाम सुबक दिसते. कापडाचा आणि दोर्‍याचा ताण नीट एकसारखा असेल तर रिंग काढल्यावर कापड आणि भरतकाम लोळागोळा न होता तसेच रहाते.

रेशीम लडीतुन सोडवुन वापरणे -
कापड साधे सुती असेल तर साधारण ६ पदरी दोर्‍यातले २ पदर वापरावेत. डिझाईन मोठे आणि बटबटीत असेल तर ४-६ पदरी वापरावेत. काही मध्यम आकाराच्या डिझईनना ३ पदरी रेशीम वापरता येते. पडदे, साड्या, बेडशीट, ड्रेस वगैरेसाठी रेशीम जास्त लागते अशावेळी लागणारे सर्व रेशीम एकदम आणुन ठेवावे कारण कंपनीने एखादा रंग discontinue केला तर काय करावे हा प्रश्न पडत नाही आणि एकेक लड संपल्यावर दुकानच्या फेर्‍या मारत बसावे लागत नाही. वापरत असणार्‍या सर्व रेशमांचे रंगांचे नंबर एका कागदावर टिपुन ठेवावेत म्हणजे एखदेवेळी लडीला लावलेले नंबर हरवले तर गडबड होत नाही.

लड करताना रेशमाचे एक टोक ओढले तर सहजी लडीतुन सोडवले जाईल असे ठेवलेले असते. ते टोक हलक्या हाताने लडीतुन ओढावे साधारण २ वेढे ओढले की पुरेश्या लांबीचे रेशीम लडीतुन सोडवले जाते. आता ते रेशीम लडीबरोबर कापुन घ्यावे. कापलेल्या रेशमाच्या तुकड्यातले २ पदर नीट सोडवुन घ्यावेत. आणि उरलेले ४ पदर नीट जपुन ठेवावेत. सोडवलेले २ पदर सुईमधे ओवुन २ पदरीच ठेवावेत. दोन्ही टोके एकमेकांना न जोडता एक रेशमाचे एक टोक सुटे ठेवुन दुसर्‍या टोकाला गाठ घालुन घ्यावी.

सुरुवात करण्यापुर्वी ...
भरतकाम शिकण्यास सुरुवात करण्यापुर्वी खालील साहीत्य असेल तर शिकण्यामधे सहजता येईल. सामान नसल्यामुळे अडुन रहाणार नाही.
१. अर्धा ते एक मीटर पांढरे किंवा ऑफव्हाईट रंगाचे सुती कापड. या कापडावर तुम्ही सगळे नमुने शिकुन ठेवु शकता आणि त्यावर पेनने नावे लिहुन ठेवलीत तर पुढे पहाण्यासाठी उपयोगी पडते.
२. १-२ काळ्या साध्या पेन्सील्स. शक्यतो मेकॅनिकल पेन्सील वापरु नयेत
३. १-२ ट्रेसिंग पेपर शीट किंवा १-२ कागदाच्या मापाचे तुकडे, ३-४ साधे प्रिंटीग पेपरसारखे पेपर्स.
४. काळा, निळा, पिवळा, लाल रंगाचे कार्बन पेपर - हे मी भारतातुन येताना आणते. US मधे मला मायकेल्समधे पांढरा आणि काळ्या रंगाचे कार्बन ग्राफाईट पेपर म्हणुन मिळाले पण बाकिच्या रंगाचे नाही.
५. लाल, हिरवा, पोपटी, पिवळा, काळा, निळा, चॉकलेटी, गुलाबी अशा तुम्हाला आवडणर्‍या रंगांच्या रेशमाच्या लड्या. शिकण्यासाठी शक्यतो ६ पदरी रेशीम वापरावे कारण ते सुती असल्याने लवकर तुटत नाही आणि गुंता, गाठी होण्याचे प्रमाण कमी. भारतात शक्यतो Anchor चे रेशीम वापरावे. भारताबाहेर DCM चे रेशीम मिळते ते वापरावे.
६. २-३ प्रकारच्या भरतकामाच्या सुया. या घेताना शक्यतो लांब नेढयाच्या घ्याव्यात. १ लहान नाजुक, एखादी मध्यम आणि एखादी जाड असेल अशा बघुन घ्याव्यात. सुया टोचुन ठेवण्यासाठी एखादा कापडाचा तुकडा, छोटा हातरुमाल असे काहीतरी ठेवावे.
७. १ बारीक टोकाची कात्री आणि शक्य असेल तर एखादी वाकड्या टोकाची कात्री
८. तुमच्याकडे असणारी, तुम्हाला आवडणारी काही डिझाईन्स.
९. एक ३-४ इंच व्यासाची रिंग आणि एखादी मध्यम म्हणजे ७-८ इंच व्यासाची रिंग (हया शक्यतो लाकडाच्या घ्याव्यात. प्लास्टीक रिंगमधुन सुळसुळीत कापड सटकते आणि पत्र्याच्या रिंग्स गंजु शकतात.) ह्याना embroidery frame असे म्हणातात.
१०. एखादा प्लास्टीकचा डबा ज्यात तुम्ही हे सगळे सामान नीट ठेवु शकता आणि एखादी प्लास्टीकची पिशवी ज्यात छाप, कार्बनपेपर्स नीट ठेवता येतात. एखादी जुनी फाईलही यासाठी वापरता येते.
११. कापडावर डिझाईन छापताना शक्यतो टेबल, फरशीवर ठेवुन छापावे. कार्पेट, सतरंजी असल्या पृष्ठ्भागावर ठेवुन छापले तर छाप न कापडावर न उमटण्याची शक्यता असते.

महत्वाची सुचना - मी टाक्यांसाठी वापरलेली नावे तुमच्यासाठी कदचीत अपरिचीत असतील किंवा मी लिहिलेली नावे कदाचीत चुकीची असली तर मला तसे कळवले तर मला देखील माझ्या चुका सुधारता येतील. त्याचप्रमाणे मी गरजलागेल तशी काही पुस्तकांची मदत घेण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मी काही आकृत्या एखाद्या वेबसाईवरुन घेईन पण त्याप्रमाणे तशी तळटीप पण देईनच.

मला वाटते एवढे तेल नमनासाठी पुरे झाले आता मुख्य नाटकाला पुढच्या पोस्टपासुन सुरुवात करु :)

Friday, December 14, 2007

|| श्री गणेशाय नम: ||

कोणत्याही शुभकार्याची सुरूवात गणेशाला वंदन करून करावी असा संकेत आहे. माझ्या नवीन ब्लाॅगची सुरूवात त्याला नमन करूनच.