Sunday, July 27, 2008

डिनर नॅपकिन्स

एका मैत्रीणीला काहीतरी गिफ्ट द्यावे असे खुप मनात होते पण काय द्यावे ते सुचत नव्हते. त्यच दरम्यान तिच्याकडे डिनरला गेले असताना प्लेन डिनर नॅपकिन्स पाहीले. तिला जरा घाबरतच विचारले की भरत्काम करून देऊ का? साधे सोपे काहीतरी करायचे होते अचानक मासे भरावेत असे वाटले लगेच डिझाईन करून चापून ठेवले. साधारण २ तासात पूर्ण सेट तयार झाला. त्यातल्या दोन नॅपकिन्सचा हा फोटो

Dinner Napkins

एका नॅपकिनचा थोडा डिटेल फोटो -

Close look at the fishes!

हे पण संपूर्ण डिझाईन कांथावर्कनेच केले आहे.

कांथावर्क

ब-याच दिवसांपासून हा फोटो इथे टाकायचा म्हणून ठरवला होता आज वेळ मिळाला. साधा प्लेन शर्ट मिळाला विकत त्यावर काहीतरी कारागीरी करायची हुक्की आली. कांथावर्क केले कारण सोपे आणि उठावदार दिसते म्हणून. शर्टच्या बाह्या रँगलन प्रकारच्या असल्याने डिझाईन छापणे आणि भरणे सोपे गेले. पिवळ्या रंगाच्या कार्बनने डिझाईन केले. डेनिम ब्लु रंगाने कांथावर्कने विणले. साधरण ४५ मिनीटात 'कस्ट्म शर्ट' तयार!

Kantha Work

Thursday, March 20, 2008

क्षमस्व

सध्या मला ऑफीसमधील काम आणि इतर कारणांमुळे नमुने करुन फोटो काढुन इथे ते नीट लिहिणे शक्य होत नाही. मला लिहायचे म्हणुन लिहिणे आणि थातुर-मातुर काहीतरी लोकांसमोर ठेवणे आवडत नसल्याने हा उपक्रम थोडे दिवस थांबवला आहे. जेव्हा जमेल तेव्हा लिहुन ठेवते आहेच पण सगळे नीट जमुन पोस्ट करायाला थोडा वेळ जाईल असे वाटतेय.
साधारण एप्रील महिन्याच्या सुरुवातीला हा ब्लॉग परत वेग घेईल असा माझा अंदाज आहे. तोपर्यंत तुम्ही धीर धराल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काही शंका/अडचणी असतील तर नक्की लिहा, मदत करायचा प्रयत्न जरूर करेन.

तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल अनेक धन्यवाद.

Wednesday, January 23, 2008

गाठीचा टाका

गाठीचा टाका

गाठीचा टाका घालण्यासाठी काही गोष्टी लक्शात ठेवणॅ जरूरीचे आहे. गाठीच्या टाक्याला मोठे मोठे डिझाईन असावे. हा टाका शक्यतो पडद्यासाठी, बेडकव्हर वगैरेसाठी वापरावा. कापड शक्यतो कॉटनचे आणि सुई जाड असावी. भरतकामासाठी शक्यतो ४ ते ६ पदरी रेशीम वापरावे.

डिझाईनसाठी एक रेघ काढुन घ्या. जाड सुईमध्ये ६ पदरी रेशीम ओवुन घ्या. रेघ उभी दिसेल अशाप्रकारे रिंग समोर धरा. आता रेघेच्या खालच्या टोकाला सुई कापडातून वर काढा. साधारन ३-४ मिलीमीटर अंतरावर सुई रेघेवर कापडात खाली घाला आणि साधरण २ मिलीमीटर अंतरावर रेघेच्या डाव्याबाजुला कापडातुन पूर्ण वर काढा. आता सुई आत्ता आपण घातलेल्या धाग्याच्या खालुन पण कापडात आत न घालता उजवीकडुन डावीकडे घालायची आहे. यामुळे आधीच्या टाक्यावर एक फुली घातल्याप्रमाणे दिसेल. आता या फुलीच्या वरच्या भागात पहीला जो टाका टाकला होता त्याखालुन पुन्हा सुई घाला पण कापडात टोचु नका. त्या सुईखाली मुख्य धाग्याने गहु टाक्याला घालतो त्यापद्धतीने वेढा घाला. सुई हलक्या हाताने पूर्ण वर काढा. असेच डिझाईन पूर्ण करा.


Knot -1

Knot - 2

Knot - 3

Knot - 4

Knot - 5

Knot - 6

Knot Design


उपयोग - मोठी मोठी फुले, पाने (साधारण ८-१० इंच व्यास असलेली) या टाक्याने आउटलाईनने भरतात. नाजुन कामासाठी हा टाका उपयोगी नसतो. परंतु नाजुन फुले थोडे कष्ट घेऊन ३ पदरी धाग्याने भरली तरी चांगले दिसु शकते. लहान मुलांच्या दुपट्यांवर वगैरे ३ पदरी धाग्याने कार्टून कॅरॅक्टर्स ह्या टाक्याने भरलेली मी पाहीलेली आहेत.

Monday, January 21, 2008

साडी, ड्रेस, टेबक्लॉथ सारखे मोठे काम करताना --

मधे ब्लॉगवर एका मुलीने मला विचारले की मला साडीवर भरतकाम करायचे आहे कोणते डिझाईन घेऊ, कोणते टाके घेऊ असे विचारले. बरेच दिवस विचार केला यावर आणि या पोस्टप्रपंचावर येऊन गाडी थांबली आहे. आपण खुपदा साड्या, ड्रेसेस वगैरे भरत काम केलेले पहातो आणि आपणही तसेच करावे अशी इच्छा होते. पण काय करावे कसे करावे हे सुचत नाही कधी कधी समजतही नाही. त्यासाठी मला आलेले अनुभव त्यातुन शिकलेल्या काही गोष्टी मुद्दाम नमुद कराव्या वाटल्या त्या सांगायचा एक प्रयत्न. यामधे कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही. प्रामाणीकपणे मनात आलेय ते सांगतेय. या सगळ्यातून मी स्वतः नेहेमी जाते, त्रास होतो तेव्हा हे मला पण तितकेच लागू आहे.

एखाद्याने साडीवर भरतकाम केले म्हणुन मला करायचेय या पेक्षा मला ते काम जमेल का? माझ्याकडे तेवढा पेशन्स आहे का? तेवढा वेळ द्यायची तयारी आहे का? हा विचार प्रथम करावा. मुख्य महणजे आपण हातात घेतलेले काम पूर्ण करतो का? ह्याचा स्वतःशीच विचार करावा. खुपदा भावनेच्या भरात किंवा मैत्रीणीने केले म्हणुन वगैरे आपण काहीतरी करायला घेतो आणि त्यात खुप इंटरेस्ट नसेल तर दुर्लक्ष केले जाते आणि काम पूर्ण होत नाही. त्यात कपडा, कष्ट, दोरे, वगैरे वाया जातात. तेव्हा काम सुरु करण्यापूर्वी आधी थोडा वेळ घालवून आपण काम पूर्ण करु शकु का याचा पडताळा घेणे बरे. बरेचदा ऑफीसच्या कामात अडकून जाऊन या कामाला हत लावणे शक्य होत नाही तेव्हा होणारी चिडचीड वगैरे आपण सहन करु शकू का हाही विचार करावा. याहुनही महत्वाचे, या कामातला इंटरेस्ट काम शेवटाला नेईपर्यंत टिकुन राहील का याचा विचार काम हातात घेण्यापूर्वी करावा.

तुम्ही पुणे, मुंबई वगैरे सारख्या मोठ्या शहरात रहात असाल तर रेशीमवगैरे विकणा-या दुकानात साड्या छापून देतात का याची चौकशी करावी. बरेचदा ते दुकानदार हे काम करतात. त्यांच्याकडे बरेचदा डिझाईनची पुस्तके, नमुने असतात त्यातुन डिझाईन निवडणे सोपे असते. त्याआधी तुम्हाला कोणाते टाके वापरून काम करायचे आहे ते ठरवावे लागेल. आणि हे तुम्हाला बाकी कोणी सांगण्यापेक्षा तुमच्या आवडीनुसार, सोईनुसार ठरवावे लागेल. उदाहरणार्थ, तुम्हाला कोणी म्हणाले की ' Long and Short' ने गुलाबाची फुले का नाही करत?' सांगणारा सांगुन जातो पण त्यात कष्ट किती आहेत? ते घेण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला तो टाका येतो का? साडीवर भरण्याइतका सुबक येतो का? हा विचार तुम्हाला स्वतःलाच करावा लागेल. डिझाईन ठरवण्याआधी मनाशी ठरवून ठेवावे की कोणाते टाके वापरायचे आहेत. यापुढची पायरी म्हणजे साडीवर डिझाईन कुठे चापायचे आहे? फक्त पदरावर? की काठ आणि पदर? की फक्त बुट्टे आणि पदर? हा अवाका पण तुमहाला स्वतःलाच ठरवावा लागेल. हे सगळे दुकानात जाण्यापुर्वी मनाशी ठरवावे लागेल. त्यानुसार दुकानदाराला डिझाईन दाखवायला सांगावे. डिझाईन पहाताना तुम्ही मनाशी ठरवलेले अडाखे सतत घोळत असावेत. कारण जसे जसे आपण डिझाईन पहात जातो तसे तसे आपण मनाशी ठरवलेले कुठेतरी विसरले जाते आणि काहीतरी वेगळेच होते! डिझाईन एकदा ठरवले की त्यांना छापायला सांगावे आपल्याला नक्की कोठे हवे आहे ते त्यांना २-३ वेळा सांगुन पक्के समजलेय ना? याची खात्री करावी.

छापून झालेले आणताना रेशीम, सुया, नवीन रिंग लागणार असेल तर, हे सगळे साहित्य आणावे. मला बरेचवेळा विचारलेला गेलेला अजुन एक प्रश्न म्हणाजे रेशमाचे रंग कसे निवडायचे? याला पण 'one size fits all!' इतके सोपे उत्तर नाही. बरेचदा मी स्वतः एखादी आवडलेली साडी असेल तर त्याचे color combination कसे आहे याची मनाशी नोंद ठेवते. उदाहरणार्थ नेव्ही ब्लू कापडावर पांधरा, ऑफव्हाईट, बेबी ब्लु, बेबी पिंक, हे रंग चांगले दिसतात. ऑफव्हाईट रंगावर बरेचसे रंग चांगले दिसतात. रेशीम विकत घेताना लडी एकमेकीशेजारी ठेवून पहावे म्हणाजे म्हणजे combination कसे दिसेल याची थोडीफार कल्पना येईल. रेशीम किती लागेल याचा अंदाज असणे जरूरीचे आहे. त्यासाठी दुकानदारही कदाचीत मदत करु शकेल. आधी केलेल्या कामात किती रेशीम लागले होते ते आठवून त्याप्रमाणे रेशमाची खरेदी करवी. साडी, बेडशीट वगैरेसाठी रेशीम घेताना प्रत्येक रंगाच्या १-२ लडी जास्त घेऊन ठेवाव्यात.

सुई निवडताना पातळ कपड्यासाठी नाजुक सुई निवडावी. सुया घेताना शक्यतो लांब नेढ्याच्या, टोकदार बघुन घ्याव्यात. बोथट सुयांमुळे कापडाचे धागे निघु शकतात. त्याचप्रमाणे बेडशीट वगैरे भरण्यासाठी शक्यतो थोड्या जाड टोकदार सुया घ्याव्यात. सुई लांबीने खुप लहान असु नये. अगदी लहान सुई फक्त कसुती/कर्नाटकी कशीद्यासाठी उपयोगी पडते. तसेच अगदी मोठी जाड सुई शक्यतो गाठीचा टाका जाड कॉटनच्या कापडासाठी उपयोगी पडते. मध्यम उंचीची म्हणजे साधारण १.५ ते २ इंच उंचीची लांब नेढ्याची सुई ब-याच कामासाठी उपयोगाची होते. कांथावर्क साठी थोडी लांबीला जास्त(२" ते २.५") अशी सुई निवडली तर एकावेळी अनेक टाके घालणे शक्य होते. साडी, बेडशीट साठी जर २-३ रंग वापरणार असाल तर प्रत्येक रंगासाठी एक सूई ठेवली तर धागे बदलण्याचा त्रास वाचु शकतो. तसेच सुया बदलताना त्यातले रेशीम कुठेतरी पडुन हरवणे, आणि असे बरेचवेळा झाल्यामुळे रेशीम कमी पडणे या गोष्टी टाळल्या जातात. सुया नीट ठेवण्यासाठी एखादा कापडाचा तुकडा, एखादा लहान रुमाल कामाबरोबर ठेवावा. आणि सुया त्यालाच टोचुन ठेवण्याची सवय पहिल्यापासुन लावुन घ्यावी.

कामाचे कापड, सर्व रेशीम, सुया, लहान कात्री, रिंग वगैरे सगळे एका पिशवीमधे घालुन ठेवावे.काम करायला बसताना हात स्वच्छ धुवुन, स्वच्छ जागेत बसावे कारण कापड धुळीने खराब होऊन डाग वगैरे पडु शकतात.

परदेशात रहात असाल तर डिझाईन निवडणे, छापणे यागोष्टी खुप सोईस्कर नसतात. ब-याचवेळा आपले डिझाईन स्वतः बनवणे, स्वतः छापणे वगैरे करावे लागते. त्यासाठी तेवढा पेशन्स असणे गरजेचे आहे :) डिझाईन कापडावर कोठे छापायचे ती मापे टाकणे, त्या खुणा करुन घेणे. तेवढे कार्बन मिळवणे हे सर्व आपले आपणच करावे लागते. ४० इंचचे डिझाईन असेल तर १०" करुन १ चार वेळा छापायचे का ४०" छाप तयार करुन छापायचे हे 'निर्णय' देखील आपले आपणच करावे लागतात.

या पोस्टमधुन तुम्हाला हवी असलेली माहीती मिळाली का? की अजुन काही हवी आहे ते कळवा त्यानुसार माहीती देण्याचा प्रयत्न करेन.

Wednesday, January 9, 2008

काश्मिरी टाका

काश्मिरी टाका

डिझाईनसाठी मध्यम आणि लांबट आकराच्या पाना-फुलाचे डिझाईन काढुन घ्या. पाकळी तुमच्या समोर उभी येईल (परागकणाकडील भाग तुमच्या बाजुला) अशी रिंग धरा. आता सुई पाकळीच्या डाव्या रेघेवर मुळापासुन साधारण २ मिलीमीटर अंतरावर कापडातून वर काढा. तीच सुई पाकळीच्या मुळात खाली घालावी आणि उजव्या पाकळीच्या रेघेवर साधारण २-३ मिलीमीटर अंतरावर वर काढा (इथे एक तिरकस टाका पाकळीत दिसेल). आता सुई पहील्यांदा जीथे कापडातून वर काढली होती त्याच्या पॉईंटच्या खाली परत खाली घाला आणि त्या टाक्याच्या वर कापडातून वर काढा. पुढचा टाका घालताना उजव्या बाजुच्या आधीच्या २ टाक्याच्या मधोमध खाली घालुन दुस-या टाक्याच्यावर कापडातुन वर काढावी. असे करत पाकळी पूर्ण करावी. असेच पूर्ण फूल भरावे.
KashmirI - Design

Kashmiri - 1

Kashmiri - 2

Kashmiri - 3

Kashmiri - 4

Kashmiri - 5

Kashmiri - Petal


उपयोग - लांबट आकाराच्या फुलाच्या पाकळ्या, लांबट पाने, फुलाच्या मधले लंबगोल ह्या टाक्याने भरता येतात.

Friday, January 4, 2008

हेरिंगबोन स्टीच

हेरिंगबोन स्टीच

सिंगल हेरिंगबोन स्टिच -
डिझाईनसाठी एकमेकीना समांतर रेघा काढुन घ्या. आता त्या रेघा तुमच्यासमोर आडव्या असतील अशी रिंग धरा. आता सुई वरच्या रेघेच्या डाव्या टोकाला वर काढा. आता सुई खालच्या रेघेवर डावीकडुन साधारण १/२ सेंटीमीटर अंतर सोडुन कापडात खाली घालावी पण पूर्णपणे खाली न घालता अगदी किंचीत अंतर (२-३ मिलीमीटर) सोडुन डावीकडे कापडातुन रेघेवर काढावी. आता सुई वरच्या रेघेवर डवीकडुन उजवीकडे साधारण पहिल्या टाक्याच्या १/२ सेंटीमीटर अंतरवर काढावी. असे करत डिझाईन पूर्ण करावे.

उपयोग - बॉर्डरसाठी हा टाका वापरता येतो. हा टाका लखनवी चिकन वर्क (Shadow Work) साठी वापरला जातो. ते कसे हे आपण नंतर पाहू.

Herringbone 1-1

Herringbone 1-2

Herringbone 1-3

Herringbone 1-4

डबल हेरिंगबोन स्टिच प्रकार १ -

डिझाईनसाठी एकमेकीना समांतर अशा २ रेघा काढायच्या आहेत. सिंगल हेरिंगबोन स्टिच प्रमाणे एका रंगाने पूर्ण डिझाईन भरुन घ्यावी. आता एखाद्या दुस-या रंगाने पहिल्या टाक्यांच्या मधे परत हेरिंगबोन टाका घालायचा आहे. सुई पहिल्या रंगाने टाका सुरु करताना जिथे वर काढली होती त्याच्या थोड्या डाव्या बाजुला कापडातून वर काढायची आहे. आधीच्या टाक्यांमधील अंतरात पुढच्या रंगाने हेरिंबबोन टाके घालत डिझाईन पूर्ण करायचे आहे. पहिल्या टाक्यांच्यावेळी दोन टाक्यांमधले अंतर जितके जास्त असेल त्याप्रमाणे २ किंवा ३ रंगाने हेरिंगबोन घालु शकता.

Herringbone 2-1

Herringbone 2-2

Herringbone 2-3

डबल हेरिंगबोन स्टिच प्रकार २ -

डिझाईनसाठी एकमेकीना समांतर अशा २ रेघा काढायच्या आहेत. सिंगल हेरिंगबोन स्टिचघालुन डिझाईन पूर्ण करुन घ्यावे पण २ टाक्यातले अंतर साधरण एक सेंटीमीटर इतके ठेवावे. आत दुस-या रंगाने सुरुवात करताना खालच्या रेघेवर सुरुवात करुन दुसरा टाका आधिच्या ओळीच्या दोन टाक्यांच्या मधोमध घालायचा आहे. असे करत डिझाईन पूर्ण करायचे आहे.

Herringbone 3-1

Herringbone 3-2

Herringbone 3-3

Herringbone 3-4

Herringbone Stitches

Thursday, January 3, 2008

बॉर्डरसाठी काही टाके

बॉर्डरसाठी काही टाके

बॉर्डरसाठी काही वेगळे टाके देतेय. यामधे कोणतेही बदल तुमच्या आवडीनुसार करु शकता.

१. प्रकार १-
डिझाईनसाठी एक साधी रेघ काढुन घ्यावी. त्यावर साधा धावदोरा पण नाजुक असेल असा घालुन घ्यावा. आता दुस-या रंगाने त्या धाग्यातुन एकदा डावीकडुन एकदा उजवीकडुन असा दोरा फिरवावा. पण हे सगळे वरच्यावर करायचे आहे. कापडात सुयी खाली घालायची नाही.
Boder 1-1

Border 1-2

Border 1-3

Border 1-4

Border 1-5

Border 1-6२. प्रकार २-
डिझाईन म्हणुन समांतर अशा २ रेघा काढुन घ्याव्यात. त्या दोन्ही रेघांवर धावदोरा घालावा. दुसर्या रेघेवर धावदोरा घालताना टाके शक्यतोवर पहिल्या टाक्यांना समांतर येतील असे घालावेत. आता वेगळ्या रंगाच्या दो-याने एका रेघेच्या एका धाग्यातुन सुई दुस-या रेघेकडे जाईल अशी घालावी आणि दुसर्या रेघेचा पहिल टाका तसाच सोडुन पुढच्या टाक्याच्या खाली सुई घालुन बाहेर काढावी. आता परत पहिल्या रेघेचा एक टाका सोडुन पुढच्या टाक्याखालुन सुई काढावी. असे करत पुर्ण नाग्मोड करुन घ्यावी. आता सोडलेल्या टाक्यांमधुन अशीच नागमोड करुन घ्यावी.

Border 2-1

Border 2-2

Border 2-3

Border 2-4