Monday, January 21, 2008

साडी, ड्रेस, टेबक्लॉथ सारखे मोठे काम करताना --

मधे ब्लॉगवर एका मुलीने मला विचारले की मला साडीवर भरतकाम करायचे आहे कोणते डिझाईन घेऊ, कोणते टाके घेऊ असे विचारले. बरेच दिवस विचार केला यावर आणि या पोस्टप्रपंचावर येऊन गाडी थांबली आहे. आपण खुपदा साड्या, ड्रेसेस वगैरे भरत काम केलेले पहातो आणि आपणही तसेच करावे अशी इच्छा होते. पण काय करावे कसे करावे हे सुचत नाही कधी कधी समजतही नाही. त्यासाठी मला आलेले अनुभव त्यातुन शिकलेल्या काही गोष्टी मुद्दाम नमुद कराव्या वाटल्या त्या सांगायचा एक प्रयत्न. यामधे कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही. प्रामाणीकपणे मनात आलेय ते सांगतेय. या सगळ्यातून मी स्वतः नेहेमी जाते, त्रास होतो तेव्हा हे मला पण तितकेच लागू आहे.

एखाद्याने साडीवर भरतकाम केले म्हणुन मला करायचेय या पेक्षा मला ते काम जमेल का? माझ्याकडे तेवढा पेशन्स आहे का? तेवढा वेळ द्यायची तयारी आहे का? हा विचार प्रथम करावा. मुख्य महणजे आपण हातात घेतलेले काम पूर्ण करतो का? ह्याचा स्वतःशीच विचार करावा. खुपदा भावनेच्या भरात किंवा मैत्रीणीने केले म्हणुन वगैरे आपण काहीतरी करायला घेतो आणि त्यात खुप इंटरेस्ट नसेल तर दुर्लक्ष केले जाते आणि काम पूर्ण होत नाही. त्यात कपडा, कष्ट, दोरे, वगैरे वाया जातात. तेव्हा काम सुरु करण्यापूर्वी आधी थोडा वेळ घालवून आपण काम पूर्ण करु शकु का याचा पडताळा घेणे बरे. बरेचदा ऑफीसच्या कामात अडकून जाऊन या कामाला हत लावणे शक्य होत नाही तेव्हा होणारी चिडचीड वगैरे आपण सहन करु शकू का हाही विचार करावा. याहुनही महत्वाचे, या कामातला इंटरेस्ट काम शेवटाला नेईपर्यंत टिकुन राहील का याचा विचार काम हातात घेण्यापूर्वी करावा.

तुम्ही पुणे, मुंबई वगैरे सारख्या मोठ्या शहरात रहात असाल तर रेशीमवगैरे विकणा-या दुकानात साड्या छापून देतात का याची चौकशी करावी. बरेचदा ते दुकानदार हे काम करतात. त्यांच्याकडे बरेचदा डिझाईनची पुस्तके, नमुने असतात त्यातुन डिझाईन निवडणे सोपे असते. त्याआधी तुम्हाला कोणाते टाके वापरून काम करायचे आहे ते ठरवावे लागेल. आणि हे तुम्हाला बाकी कोणी सांगण्यापेक्षा तुमच्या आवडीनुसार, सोईनुसार ठरवावे लागेल. उदाहरणार्थ, तुम्हाला कोणी म्हणाले की ' Long and Short' ने गुलाबाची फुले का नाही करत?' सांगणारा सांगुन जातो पण त्यात कष्ट किती आहेत? ते घेण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला तो टाका येतो का? साडीवर भरण्याइतका सुबक येतो का? हा विचार तुम्हाला स्वतःलाच करावा लागेल. डिझाईन ठरवण्याआधी मनाशी ठरवून ठेवावे की कोणाते टाके वापरायचे आहेत. यापुढची पायरी म्हणजे साडीवर डिझाईन कुठे चापायचे आहे? फक्त पदरावर? की काठ आणि पदर? की फक्त बुट्टे आणि पदर? हा अवाका पण तुमहाला स्वतःलाच ठरवावा लागेल. हे सगळे दुकानात जाण्यापुर्वी मनाशी ठरवावे लागेल. त्यानुसार दुकानदाराला डिझाईन दाखवायला सांगावे. डिझाईन पहाताना तुम्ही मनाशी ठरवलेले अडाखे सतत घोळत असावेत. कारण जसे जसे आपण डिझाईन पहात जातो तसे तसे आपण मनाशी ठरवलेले कुठेतरी विसरले जाते आणि काहीतरी वेगळेच होते! डिझाईन एकदा ठरवले की त्यांना छापायला सांगावे आपल्याला नक्की कोठे हवे आहे ते त्यांना २-३ वेळा सांगुन पक्के समजलेय ना? याची खात्री करावी.

छापून झालेले आणताना रेशीम, सुया, नवीन रिंग लागणार असेल तर, हे सगळे साहित्य आणावे. मला बरेचवेळा विचारलेला गेलेला अजुन एक प्रश्न म्हणाजे रेशमाचे रंग कसे निवडायचे? याला पण 'one size fits all!' इतके सोपे उत्तर नाही. बरेचदा मी स्वतः एखादी आवडलेली साडी असेल तर त्याचे color combination कसे आहे याची मनाशी नोंद ठेवते. उदाहरणार्थ नेव्ही ब्लू कापडावर पांधरा, ऑफव्हाईट, बेबी ब्लु, बेबी पिंक, हे रंग चांगले दिसतात. ऑफव्हाईट रंगावर बरेचसे रंग चांगले दिसतात. रेशीम विकत घेताना लडी एकमेकीशेजारी ठेवून पहावे म्हणाजे म्हणजे combination कसे दिसेल याची थोडीफार कल्पना येईल. रेशीम किती लागेल याचा अंदाज असणे जरूरीचे आहे. त्यासाठी दुकानदारही कदाचीत मदत करु शकेल. आधी केलेल्या कामात किती रेशीम लागले होते ते आठवून त्याप्रमाणे रेशमाची खरेदी करवी. साडी, बेडशीट वगैरेसाठी रेशीम घेताना प्रत्येक रंगाच्या १-२ लडी जास्त घेऊन ठेवाव्यात.

सुई निवडताना पातळ कपड्यासाठी नाजुक सुई निवडावी. सुया घेताना शक्यतो लांब नेढ्याच्या, टोकदार बघुन घ्याव्यात. बोथट सुयांमुळे कापडाचे धागे निघु शकतात. त्याचप्रमाणे बेडशीट वगैरे भरण्यासाठी शक्यतो थोड्या जाड टोकदार सुया घ्याव्यात. सुई लांबीने खुप लहान असु नये. अगदी लहान सुई फक्त कसुती/कर्नाटकी कशीद्यासाठी उपयोगी पडते. तसेच अगदी मोठी जाड सुई शक्यतो गाठीचा टाका जाड कॉटनच्या कापडासाठी उपयोगी पडते. मध्यम उंचीची म्हणजे साधारण १.५ ते २ इंच उंचीची लांब नेढ्याची सुई ब-याच कामासाठी उपयोगाची होते. कांथावर्क साठी थोडी लांबीला जास्त(२" ते २.५") अशी सुई निवडली तर एकावेळी अनेक टाके घालणे शक्य होते. साडी, बेडशीट साठी जर २-३ रंग वापरणार असाल तर प्रत्येक रंगासाठी एक सूई ठेवली तर धागे बदलण्याचा त्रास वाचु शकतो. तसेच सुया बदलताना त्यातले रेशीम कुठेतरी पडुन हरवणे, आणि असे बरेचवेळा झाल्यामुळे रेशीम कमी पडणे या गोष्टी टाळल्या जातात. सुया नीट ठेवण्यासाठी एखादा कापडाचा तुकडा, एखादा लहान रुमाल कामाबरोबर ठेवावा. आणि सुया त्यालाच टोचुन ठेवण्याची सवय पहिल्यापासुन लावुन घ्यावी.

कामाचे कापड, सर्व रेशीम, सुया, लहान कात्री, रिंग वगैरे सगळे एका पिशवीमधे घालुन ठेवावे.काम करायला बसताना हात स्वच्छ धुवुन, स्वच्छ जागेत बसावे कारण कापड धुळीने खराब होऊन डाग वगैरे पडु शकतात.

परदेशात रहात असाल तर डिझाईन निवडणे, छापणे यागोष्टी खुप सोईस्कर नसतात. ब-याचवेळा आपले डिझाईन स्वतः बनवणे, स्वतः छापणे वगैरे करावे लागते. त्यासाठी तेवढा पेशन्स असणे गरजेचे आहे :) डिझाईन कापडावर कोठे छापायचे ती मापे टाकणे, त्या खुणा करुन घेणे. तेवढे कार्बन मिळवणे हे सर्व आपले आपणच करावे लागते. ४० इंचचे डिझाईन असेल तर १०" करुन १ चार वेळा छापायचे का ४०" छाप तयार करुन छापायचे हे 'निर्णय' देखील आपले आपणच करावे लागतात.

या पोस्टमधुन तुम्हाला हवी असलेली माहीती मिळाली का? की अजुन काही हवी आहे ते कळवा त्यानुसार माहीती देण्याचा प्रयत्न करेन.

No comments: