
भरतकाम शिकण्यास सुरुवात करण्यापुर्वी खालील साहीत्य असेल तर शिकण्यामधे सहजता येईल. सामान नसल्यामुळे अडुन रहाणार नाही.
१. अर्धा ते एक मीटर पांढरे किंवा ऑफव्हाईट रंगाचे सुती कापड. या कापडावर तुम्ही सगळे नमुने शिकुन ठेवु शकता आणि त्यावर पेनने नावे लिहुन ठेवलीत तर पुढे पहाण्यासाठी उपयोगी पडते.
२. १-२ काळ्या साध्या पेन्सील्स. शक्यतो मेकॅनिकल पेन्सील वापरु नयेत
३. १-२ ट्रेसिंग पेपर शीट किंवा १-२ कागदाच्या मापाचे तुकडे, ३-४ साधे प्रिंटीग पेपरसारखे पेपर्स.
४. काळा, निळा, पिवळा, लाल रंगाचे कार्बन पेपर - हे मी भारतातुन येताना आणते. US मधे मला मायकेल्समधे पांढरा आणि काळ्या रंगाचे कार्बन ग्राफाईट पेपर म्हणुन मिळाले पण बाकिच्या रंगाचे नाही.
५. लाल, हिरवा, पोपटी, पिवळा, काळा, निळा, चॉकलेटी, गुलाबी अशा तुम्हाला आवडणर्या रंगांच्या रेशमाच्या लड्या. शिकण्यासाठी शक्यतो ६ पदरी रेशीम वापरावे कारण ते सुती असल्याने लवकर तुटत नाही आणि गुंता, गाठी होण्याचे प्रमाण कमी. भारतात शक्यतो Anchor चे रेशीम वापरावे. भारताबाहेर DCM चे रेशीम मिळते ते वापरावे.
६. २-३ प्रकारच्या भरतकामाच्या सुया. या घेताना शक्यतो लांब नेढयाच्या घ्याव्यात. १ लहान नाजुक, एखादी मध्यम आणि एखादी जाड असेल अशा बघुन घ्याव्यात. सुया टोचुन ठेवण्यासाठी एखादा कापडाचा तुकडा, छोटा हातरुमाल असे काहीतरी ठेवावे.
७. १ बारीक टोकाची कात्री आणि शक्य असेल तर एखादी वाकड्या टोकाची कात्री
८. तुमच्याकडे असणारी, तुम्हाला आवडणारी काही डिझाईन्स.
९. एक ३-४ इंच व्यासाची रिंग आणि एखादी मध्यम म्हणजे ७-८ इंच व्यासाची रिंग (हया शक्यतो लाकडाच्या घ्याव्यात. प्लास्टीक रिंगमधुन सुळसुळीत कापड सटकते आणि पत्र्याच्या रिंग्स गंजु शकतात.) ह्याना embroidery frame असे म्हणातात.
१०. एखादा प्लास्टीकचा डबा ज्यात तुम्ही हे सगळे सामान नीट ठेवु शकता आणि एखादी प्लास्टीकची पिशवी ज्यात छाप, कार्बनपेपर्स नीट ठेवता येतात. एखादी जुनी फाईलही यासाठी वापरता येते.
११. कापडावर डिझाईन छापताना शक्यतो टेबल, फरशीवर ठेवुन छापावे. कार्पेट, सतरंजी असल्या पृष्ठ्भागावर ठेवुन छापले तर छाप न कापडावर न उमटण्याची शक्यता असते.
महत्वाची सुचना - मी टाक्यांसाठी वापरलेली नावे तुमच्यासाठी कदचीत अपरिचीत असतील किंवा मी लिहिलेली नावे कदाचीत चुकीची असली तर मला तसे कळवले तर मला देखील माझ्या चुका सुधारता येतील. त्याचप्रमाणे मी गरजलागेल तशी काही पुस्तकांची मदत घेण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मी काही आकृत्या एखाद्या वेबसाईवरुन घेईन पण त्याप्रमाणे तशी तळटीप पण देईनच.
मला वाटते एवढे तेल नमनासाठी पुरे झाले आता मुख्य नाटकाला पुढच्या पोस्टपासुन सुरुवात करु :)