Tuesday, September 10, 2013

गोधडी

गोधडी हा माझ्या अतिशय जिव्हळ्याचा विषय. लहान असताना माझी एक पांढुरक्या रंगाची निळसर काठ असलेली एक गोधडी होती. माझ्या एका आज्जीने केलेली. तिने केलेल्या इतर गोधड्यांच्या मानाने बर्‍यापैकी पातळ होती. कारण मला लहान असताना वापरायला सोपी जाईल म्हणुन हलक्या सुती साड्यांची बनवलेली. माझ्या ह्या आज्जीलादेखील सतत काही ना काही करायचा छंद होता. दुपटी, कुंच्या, गोधड्या, क्रोशाचे रुमाल, क्रोशाचे मोठे मोठे टेबलक्लॉथ असे बरेच काही. तिच्याकडून मी जोडाची दुपटी आणि क्रोशा शिकले पण गोधड्या आणि कुंची शिकणे जमले नाही.

माझ्या आजीसारखीच माझ्या एका मैत्रिणीची आज्जीदेखिल तशीच, गोधड्या करणारी, सतत काहितरी हाताला उद्योग असणारी - 
http://rajanigandha.blogspot.com/2006/03/blog-post_19.html

आत्ता या दोघी आज्ज्यांची आठवण यायचे कारण काय तर सध्या नुपुर चा ब्लॉग वाचुन गोधड्या शिकाव्या का असा विचार चालू आहे. पण त्यापूर्वी एक अर्धे राहिलेले प्रोजेक्ट पूर्ण करावे म्हणून केलेला उद्योग मी लिहुन काढावा असे वाटले.

माझ्याकडे एक रजई होती, त्यातला सगळा कापूस गोळा झाला म्हणुन मग मी सगळी रजई उसवून काढली, कापूस फेकून दिला. आत घालण्यासाठी cotton चे batting विकत आणले. थोडेफार काम केले पण कंटाळा आला म्हणून मग मी बाजूला ठेवून दिले होते. असे ३-४ वेळा केले तरी ते अर्धवटच होते. शेवटी 'हे सगळे आता कचऱ्यामध्ये टाकून दिले जाईल' अशी धमकी मिळाली. अलीकडे माझ्या एका मैत्रिणीने एक मस्त क्विल्ट्चे wall hanging केले होते ते लक्षात होते. मग तिलाच गळ घातली की तुझ्या शिक्षिकेशी माझी ओळख करून दे! त्या शिक्षिकेने मला सगळे गठुळे उचलून घेऊन घरी यायला सांगितले. एके दिवशी सगळे उचलले तिच्याकडे गेले. आणि तिने एका क्षणात माझा प्रश्न ओळखला. पुढच्या ३० मिनिटात आम्ही प्लान ठरवला आणि त्यावर काम करायला सुरुवात देखील केली. जुन्या पद्धतीप्रमाणे गाठी मारून जोडणे ही पद्धत वापरली तर पटकन आणि सुंदर रजई तयार होईल असे त्यांनी सांगितले. तयार झाल्यावर ती रजई कशी दिसेल याचे प्रात्यक्षिक त्यांनी मला दाखवले. मला आणि मैत्रिणीला त्या गाठी मारायच्या कामाला सोडुन त्या दुसरे काम करायला गेल्या.
मला वाटले त्या स्वत:चे काम करत असतील. पण ते तसे नव्हते! कडेला जोडायच्या पट्ट्या त्यांनी स्वत: मशीन मध्ये धुवून वाळवल्या. पुढचा अर्धा तास त्यांनी ते सगळे मस्त इस्त्री केले. त्यांचे हे काम होईपर्यंत आमच्या गाठी मारून झाल्या. मग उरलेली इस्त्री मारून झाल्यावर ते सगळे गठुळे घेऊन त्यांच्या दक्ष देखरेखीखाली मी शिवायला बसले. कोपरे देखणे आणि सुंदर दिसण्यासाठी 'mitered corner' नावाचा एक प्रकार असतो. मला तो प्रचंड अवघड वाटायचा. त्यांनी एकदम सोपे करून शिकवले आणि मला पण ते व्यवस्थित जमले.
साधारण ३-३.३० तासात माझी गोधडी/रजई मस्तपैकी वापरायला तयार झाली होती. ह्या सगळ्या कामाचे पूर्ण श्रेय माझ्या शिक्षिकेला. त्यांनी माझ्याकडून रजई पूर्ण करून घेतली.
आता सगळे फोटो पहा -


Perfectly mitered corner


Neatly tied knots with white and red pearl cotton!

Restored Quilt  
Mitered corner and tied with nice pearl cotton all in one!


1 comment:

Balkrishna ku said...

मस्त आईच्या मायेची ऊब आली असेल