Thursday, January 19, 2012

टोप्याच टोप्या सर्वांनासुट्टीमधे केलेले काही पराक्रम तुम्ही इथे पाहिलेच आहेत. ते सगळे संपल्यावरही अजुन थोडी सुट्टी शिल्लक होती. काय करावे असा विचारच चालला होता तोवर मला सर्क्युलर सुयांवर टोपी करायला शिकायचे आहे हे लक्षात आले. पारांपारीक पद्धतीने २ सुयांवर टोपी विणली तर ती शिवावी लागते. तशी केलेली टोपी इथे पहायला मिळेल. ३-४-५ दोन टोकी सुया वापरूनही टोप्या करतात. याप्रकारे केलेल्या टोप्या शिवाव्या लागत नाहीत पण सर्व सुयांवरचे टाके सुटून जाणार नाहीत यांची काळजी घेणे, व्यवस्थीत टाके वाढवणे, तो पसारा नीट जागेवर ठेवणे हे करणे म्हणजे माझ्यासाठी महाकठीण काम होते/आहे. या कारणासाठी म्हणून मग मी सर्क्युलर सुयांवरची टोपी शिकायचीच असे ठरवले होते. देसीनिटरला यासंदर्भा॑त मी मागे विचारणा केलेली होती तेव्हा तिने युट्युबवर खुप माहिती सापडेल आणि तुला नक्की जमेल असा धीर दिला होता. तिने नुकताच एक विणकामाबद्दलचा मराठी ब्लॉग चालू केलाय. तो पहायला विसरू नका! 

तिने दिलेल्या धिराच्या जोरावर मी एकेदिवशी संध्याकाळी, जुनी लोकर, माझ्याकडे असलेली कोणत्यातरी नंबरची गोल सुई असा सगळा पसारा घेऊन एका कोपच्यात जाऊन बसले. समोर युट्युबवरची ही लिंक चालू होती. साधारण ३-४ वेळा पुढे-मागे करुन पाहीली. मग सुईवर साधारण ७० टाके घातले आणि देवाचे नाम स्मरून टाक्यांना पीळ पडलेला नाही हे ३-४ वेळा तपासले आणि सगळे टाके एकत्र करून त्याचा नीट गोल बनवला. आणि विणायला सुरुवात केले. आणि काय मज्जा! एका फटक्यात टोपीची सुरुवात झाली. मग ६-७ इंच विणकाम वाढल्यावर त्यावर मार्कर टाकून ७ भाग बनवले. आणि टाके कमी करायला सुरुवात केली. साधारण २० एक टाके राहिले तेव्हा विणायला त्रास व्हायला लागला. म्हणुन मग २ टोकांच्या सुयांवर सगळे टाके नीट हलवले. मग अगदी शेवटी ७ टाके राहिले तेव्हा मग साधारण ६-७ इंच लोकर ठेवून मग तोडून टाकली. ती लोकर बिनटोकाच्या (टेपस्ट्री नीडल) सुईत ओवून मग उरलेल्या टाक्यांमधून २-३ वेळा ओवली. नीट गाठ मारली. आणि उरलेला धागा तोडून टाकला.


तयार झालेली टोपी फारच मोठी आणि जाळीदार झाली आहे कारण मी बारीक लोकर आणि मोठी सुई वापरली होती. मग  लगोलग जाऊन जाड लोकर, त्याला लागणारी गोल सुई, त्याच नंबरच्या दोन टोकाच्या सुया असे सगळे सामान आणले. ती टोपी केली. गेल्या १५ दिवसात एकूण ५ टोप्या केल्या आहेत :) घरी सर्वांच्या डोक्यावर मी केलेली टोपी असावी (म्हणजेच मी सर्वांना टोप्या घातल्या असे सगळ्यांना म्हणता येईल) अशा विचाराने मी अजुनही टोप्या करतच आहे :)

3 comments:

mau said...

wow....

Kanchan Karai said...

आहा! टोप्या छानच झाल्या आहेत. मी देखील युट्यूबवर विणकामाचे प्रात्याक्षिक पहात असते. क्रोशाचे विणकाम मला थोडे सोपे वाटते, त्यामुळे त्यावरच भर जास्त आहे. तुमच्या टोप्या आवडल्या बरं का! देसीनिटरच्या साईट व ब्लॉगची लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद. मीदेखील सध्या माझ्या भाचीसाठी लोकरीचा फ्रॉक विणते आहे.सर्व विणकाम, हस्तकला मी माझ्या http://hobbyhub.mogaraafulalaa.com/ या ब्लॉगवर पोस्ट करत असते.

Priya said...

sagaLyaach Topyaa phaar surekh, paN malaa chhoTee gulaabi vishesh aawaDalee. kitee goaD aahe! :)