या वर्षात मी बरेच उद्योग हातात घेतले आणि पूर्ण देखिल केले. भारतभेटीत कोणी केलेल्या साड्या, ड्रेसेस वगैरे पाहिले आणि लगेच हात सुर्सुरायला लागले. साडी भरुन पूर होणे शक्य नव्हते म्हणुन मग टॉप, ड्रेस वगैरे भरायचे ठरवले साहित्याची जुळवाजुळव केली आणि करायला घेतले. भारतवारीमधे त्यातले ९०% काम पूर्ण केले आणि उरलेले इथे आल्यावर लगेचच. त्यातले बरेच कांथावर्क आहे. हा एक प्रकार माझ्या अतिशय आवडीचा. मोठे मोठे डिझाईन भरता येते. वेगवेगळ्या टाक्यांचा कल्पक वापर करता येतो.
आज थोडे कांथावर्कबद्दल - हे काम बंगालभागात बरेच केले जाते. प्लेन सिल्कची साडी आणि त्यावर उठावदार रंगाने भरलेले डिझाईन सुंदर असते. पूर्ण डिझाईन बारिक धावदोर्याने भरले जाते. अगदी पाने, फुले, पाकळ्या, असले तरी पूर्ण भरगच्च धावदोर्याने भरले जाते. वेगवेगळे रंग किंवा एकाच रंगाने हे काम करतात. शाईसारख्या निळ्या रंगाच्या साडीवर अथवा ड्रेसवर ऑफव्हाईट रंगाने केलेले काम अप्रतीम दिसते तसेचगर्द हिरव्या रंगावर पिवळ्या, गुलाबी, तपकिरी, काळ्या रंगाचे काम सुंदर दिसते.
नविन सुरुवात करायची असेल तर काश्मिरी टाक्यासाठी लागणारे कोणातेही डिझाईन कांथासाठी वापरु शकता. धावदोरा अगदी बारिक घालायचा, लहान पाकळ्या, गोल असतील तर सॅटीन वापरायचा. एका रंगात किंवा वेगवेगळे रंग वापरुन डिझाईन पूर्ण करायचे.