Thursday, January 19, 2012

टोप्याच टोप्या सर्वांना



सुट्टीमधे केलेले काही पराक्रम तुम्ही इथे पाहिलेच आहेत. ते सगळे संपल्यावरही अजुन थोडी सुट्टी शिल्लक होती. काय करावे असा विचारच चालला होता तोवर मला सर्क्युलर सुयांवर टोपी करायला शिकायचे आहे हे लक्षात आले. पारांपारीक पद्धतीने २ सुयांवर टोपी विणली तर ती शिवावी लागते. तशी केलेली टोपी इथे पहायला मिळेल. ३-४-५ दोन टोकी सुया वापरूनही टोप्या करतात. याप्रकारे केलेल्या टोप्या शिवाव्या लागत नाहीत पण सर्व सुयांवरचे टाके सुटून जाणार नाहीत यांची काळजी घेणे, व्यवस्थीत टाके वाढवणे, तो पसारा नीट जागेवर ठेवणे हे करणे म्हणजे माझ्यासाठी महाकठीण काम होते/आहे. या कारणासाठी म्हणून मग मी सर्क्युलर सुयांवरची टोपी शिकायचीच असे ठरवले होते. देसीनिटरला यासंदर्भा॑त मी मागे विचारणा केलेली होती तेव्हा तिने युट्युबवर खुप माहिती सापडेल आणि तुला नक्की जमेल असा धीर दिला होता. तिने नुकताच एक विणकामाबद्दलचा मराठी ब्लॉग चालू केलाय. तो पहायला विसरू नका! 

तिने दिलेल्या धिराच्या जोरावर मी एकेदिवशी संध्याकाळी, जुनी लोकर, माझ्याकडे असलेली कोणत्यातरी नंबरची गोल सुई असा सगळा पसारा घेऊन एका कोपच्यात जाऊन बसले. समोर युट्युबवरची ही लिंक चालू होती. साधारण ३-४ वेळा पुढे-मागे करुन पाहीली. मग सुईवर साधारण ७० टाके घातले आणि देवाचे नाम स्मरून टाक्यांना पीळ पडलेला नाही हे ३-४ वेळा तपासले आणि सगळे टाके एकत्र करून त्याचा नीट गोल बनवला. आणि विणायला सुरुवात केले. आणि काय मज्जा! एका फटक्यात टोपीची सुरुवात झाली. मग ६-७ इंच विणकाम वाढल्यावर त्यावर मार्कर टाकून ७ भाग बनवले. आणि टाके कमी करायला सुरुवात केली. साधारण २० एक टाके राहिले तेव्हा विणायला त्रास व्हायला लागला. म्हणुन मग २ टोकांच्या सुयांवर सगळे टाके नीट हलवले. मग अगदी शेवटी ७ टाके राहिले तेव्हा मग साधारण ६-७ इंच लोकर ठेवून मग तोडून टाकली. ती लोकर बिनटोकाच्या (टेपस्ट्री नीडल) सुईत ओवून मग उरलेल्या टाक्यांमधून २-३ वेळा ओवली. नीट गाठ मारली. आणि उरलेला धागा तोडून टाकला.


तयार झालेली टोपी फारच मोठी आणि जाळीदार झाली आहे कारण मी बारीक लोकर आणि मोठी सुई वापरली होती. मग  लगोलग जाऊन जाड लोकर, त्याला लागणारी गोल सुई, त्याच नंबरच्या दोन टोकाच्या सुया असे सगळे सामान आणले. ती टोपी केली. 



गेल्या १५ दिवसात एकूण ५ टोप्या केल्या आहेत :) घरी सर्वांच्या डोक्यावर मी केलेली टोपी असावी (म्हणजेच मी सर्वांना टोप्या घातल्या असे सगळ्यांना म्हणता येईल) अशा विचाराने मी अजुनही टोप्या करतच आहे :)

Sunday, December 25, 2011

कचर्‍यातून कला अर्थात Up-Cycling

सुट्टीचा सदुपयोग आणि घरातील साठवलेले सामान काढून टाकणे या कारणाने केलेला हा एक उद्योग.

मलमलच्या ओढणीपासून केलेल्या भाजी ठेवायच्या पिशव्या -
माझ्याकडे एक मलमलची मस्त ओढणी होती. काही ना काही कारणाने ती कधी वापरलीच नाही. ती तशीच जपून ठेवलेली काहीतरी करू म्हणुन. तीन चार महीन्यापूर्वी मला अशीच एक पिशवी सामानात मिळाली आहे. त्यावर भाज्या ठेवण्यासाठी पुनर्वापर करा असे लिहीलेले आहे. त्यात कोथिंबीर ठेवली तर अजिबात खराब होत नाही. सुकत जाते पण कुजत नाही हे लक्षात आले. म्हणून मग अजुन तशा पिशव्या करायच्या असे ठरवले.
साधारण २०" बाय १४ इंच असे तुकडे कापून घेतले. माझ्या ओढणीत असे १२ तुकडे झाले. नेहेमीसारखी पिशवी शिवली पण तिला बंद (हँडल) नाही केले. त्याऐवजी वरच्या पट्टीतून लोकर नाडी म्हणून वापरली. मस्तपैकी १२ पिशव्या झाल्या. आता त्यातल्या काही मला, काही मैत्रिणींना देणार!






कुर्त्यांच्या बाह्यांपासून कोस्टर्स -
भारतात अलीकडे कुर्ते विकत घेतले की स्लिव्हलेस येतात आणि सोबर त्याच्या बाह्या दिलेल्या असतात. तशा काही बाह्या मी न वापरता साठवून ठेवल्या होत्या. कित्येक दिवस त्या कपाटात पडून होत्या. त्यांचा वापर करून मी कप ठेवण्यासाठी कोस्टर्स केले. साधारण ४"बाय ४" मापाचे तुकडे कापले. माझ्याकडे इतर शिवणाच्या प्रोजेक्टसाठी आणलेले पांढरे आणि काळे कापड होते. त्याचे पण त्याच मापाचे तुकडे अस्तर म्हणून कापले. अस्तर आणि मूळ कापड असे उलट शिवून मग उलटले. कडेने परत शिवले. प्रत्येक २ बाह्यांमधे मिळून ४ कोस्टर्स झाले. कडेने मणी, वरून थोडे धावदोरे टाकून ते सजवले.




पॉट होल्डर्स आणि टेबल रनर - 
कोणत्यातरी कारणासाठी मी साधारण १/२ मीटर कापड विकत आणले होते. त्याचा वापर झालाच नव्हता. म्हणून मग त्याचा वापर करून टेबर रनर (१०" बाय ४०") आणि काही पॉट होल्डर्स (८" बाय ८") केले. त्यात आतमधे मी क्विल्टींगचे बॅटींग (कापसाचा पातळ थर) वापरला आहे.

Friday, December 16, 2011

स्नो फ्लेक्स


ख्रिसमसमध्ये एक मैत्रिण अगदी हौसेने झाड आणते आणि ते सजवते. यावर्षी तिला क्रोशाचे दोन स्नोफ्लेक्स करून पाठवले. त्याचे हे फोटो - 

खालील नमुना कुठे पाहून केला आहे तो मी विसरले आहे. थोडी शोधाशोध करून इथे देईन. 



खालील नमुना इथे पाहून केला आहे - http://yellowpinkandsparkly.blogspot.com/2009/12/snowflake-earrings.html

Thursday, November 4, 2010

शुभ दिपावली

तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुखाची, समॄद्धीची जावो. या दिवाळी निमित्ताने तुमच्याकडून एखाद्या कलेची जोपासना होवो ही सदिच्छा.

मी 'हितगुज दिवाळी अंक' या मायबोलीच्या दिवाळी अंकात कर्नाटकी कशिद्यासंदर्भात एक लेख लिहीला आहे. तो इथे पहायला मिळेल -

http://vishesh.maayboli.com/node/877

तुम्हाला लेख कसा वाटला, चित्रफीत कशी वाटली हे जरूर कळवा.

Friday, December 25, 2009

टोपी




अलिकडे एका मैत्रिणीला तिच्या वाढदिवसाला काय द्यावे असा विचार चालला होता. अगदी ड्रेस, पुस्तक, मिक्सर, स्वेटर इत्यादी प्रकार शोधुन पाहिले. पण एकही गोष्ट मनासारखी वाटेना. एकाचा रंग आवडला तर दुसर्‍याचा पॅटर्न असे काहिसे होऊन सगळे बाद ठरवण्यात आले. असाच शोध चालु असताना मला एक मैत्रिण भेटली जी स्वेटर वगैरे खुप करते. एकावेळी ३- प्रोजेक्ट तरी हातात असतातच. तिच्या सल्ल्याने आणि आग्रहाने मी एक टोपी करायला घेतली. रॅव्हलरी नावाची एक साईट आहे तिथे माझी नाव नोंदणी केली. नुपुरच्या ब्लॉगमुळे आणि देसीनिटरच्या ब्लॉगमुळे तिथे माझी नाव नोंदणी केली आणि एक मस्त सोपा पॅटर्न मिळवला.



सुरुवात केली आणि लक्षात आले की घेतलेला पॅटर्न, सुया आणि लोकर खुपच किचकट आहे.परत येरे माझ्या मागल्या करत शोधमोहिम सुरु केली. यावेळी मात्र लोकर साधी अ‍ॅक्रिलिक प्रकारची घेतली कारण तिला धुणे, वापरणे वगैरे सोपे जाईल म्हणुन. पॅटर्न पण लगेच मिळाला. सुरुवात केल्यावर लगेचच जाणवले की हे पटकन होणार आहे. तसेच झाले ११ इंच उंचीची टोपी अवघ्या दीड दिवसात पूर्ण केली. या टोपीची वीण अगदी सोपी आहे. जाड लोकरीमुळे खुलुन दिसते.




मी खालील पॅटर्न जसाच्या तसा वापरला -

http://www.knitlist.com/95gift/simphat.htm

(Above pattern is gone so adding another link where you can find this pattern - http://www.wikihow.com/Knit-the-Mistake-Rib-Pattern)

Wednesday, November 11, 2009

कांथावर्कबद्दल थोडेसे

Motif on a dress


या वर्षात मी बरेच उद्योग हातात घेतले आणि पूर्ण देखिल केले. भारतभेटीत कोणी केलेल्या साड्या, ड्रेसेस वगैरे पाहिले आणि लगेच हात सुर्सुरायला लागले. साडी भरुन पूर होणे शक्य नव्हते म्हणुन मग टॉप, ड्रेस वगैरे भरायचे ठरवले साहित्याची जुळवाजुळव केली आणि करायला घेतले. भारतवारीमधे त्यातले ९०% काम पूर्ण केले आणि उरलेले इथे आल्यावर लगेचच. त्यातले बरेच कांथावर्क आहे. हा एक प्रकार माझ्या अतिशय आवडीचा. मोठे मोठे डिझाईन भरता येते. वेगवेगळ्या टाक्यांचा कल्पक वापर करता येतो.
kantha dress

आज थोडे कांथावर्कबद्दल - हे काम बंगालभागात बरेच केले जाते. प्लेन सिल्कची साडी आणि त्यावर उठावदार रंगाने भरलेले डिझाईन सुंदर असते. पूर्ण डिझाईन बारिक धावदोर्‍याने भरले जाते. अगदी पाने, फुले, पाकळ्या, असले तरी पूर्ण भरगच्च धावदोर्‍याने भरले जाते. वेगवेगळे रंग किंवा एकाच रंगाने हे काम करतात. शाईसारख्या निळ्या रंगाच्या साडीवर अथवा ड्रेसवर ऑफव्हाईट रंगाने केलेले काम अप्रतीम दिसते तसेचगर्द हिरव्या रंगावर पिवळ्या, गुलाबी, तपकिरी, काळ्या रंगाचे काम सुंदर दिसते.

Kantha Saree

नविन सुरुवात करायची असेल तर काश्मिरी टाक्यासाठी लागणारे कोणातेही डिझाईन कांथासाठी वापरु शकता. धावदोरा अगदी बारिक घालायचा, लहान पाकळ्या, गोल असतील तर सॅटीन वापरायचा. एका रंगात किंवा वेगवेगळे रंग वापरुन डिझाईन पूर्ण करायचे.

Sunday, July 27, 2008

डिनर नॅपकिन्स

एका मैत्रीणीला काहीतरी गिफ्ट द्यावे असे खुप मनात होते पण काय द्यावे ते सुचत नव्हते. त्यच दरम्यान तिच्याकडे डिनरला गेले असताना प्लेन डिनर नॅपकिन्स पाहीले. तिला जरा घाबरतच विचारले की भरत्काम करून देऊ का? साधे सोपे काहीतरी करायचे होते अचानक मासे भरावेत असे वाटले लगेच डिझाईन करून चापून ठेवले. साधारण २ तासात पूर्ण सेट तयार झाला. त्यातल्या दोन नॅपकिन्सचा हा फोटो

Dinner Napkins

एका नॅपकिनचा थोडा डिटेल फोटो -

Close look at the fishes!

हे पण संपूर्ण डिझाईन कांथावर्कनेच केले आहे.