Sunday, December 25, 2011

कचर्‍यातून कला अर्थात Up-Cycling

सुट्टीचा सदुपयोग आणि घरातील साठवलेले सामान काढून टाकणे या कारणाने केलेला हा एक उद्योग.

मलमलच्या ओढणीपासून केलेल्या भाजी ठेवायच्या पिशव्या -
माझ्याकडे एक मलमलची मस्त ओढणी होती. काही ना काही कारणाने ती कधी वापरलीच नाही. ती तशीच जपून ठेवलेली काहीतरी करू म्हणुन. तीन चार महीन्यापूर्वी मला अशीच एक पिशवी सामानात मिळाली आहे. त्यावर भाज्या ठेवण्यासाठी पुनर्वापर करा असे लिहीलेले आहे. त्यात कोथिंबीर ठेवली तर अजिबात खराब होत नाही. सुकत जाते पण कुजत नाही हे लक्षात आले. म्हणून मग अजुन तशा पिशव्या करायच्या असे ठरवले.
साधारण २०" बाय १४ इंच असे तुकडे कापून घेतले. माझ्या ओढणीत असे १२ तुकडे झाले. नेहेमीसारखी पिशवी शिवली पण तिला बंद (हँडल) नाही केले. त्याऐवजी वरच्या पट्टीतून लोकर नाडी म्हणून वापरली. मस्तपैकी १२ पिशव्या झाल्या. आता त्यातल्या काही मला, काही मैत्रिणींना देणार!






कुर्त्यांच्या बाह्यांपासून कोस्टर्स -
भारतात अलीकडे कुर्ते विकत घेतले की स्लिव्हलेस येतात आणि सोबर त्याच्या बाह्या दिलेल्या असतात. तशा काही बाह्या मी न वापरता साठवून ठेवल्या होत्या. कित्येक दिवस त्या कपाटात पडून होत्या. त्यांचा वापर करून मी कप ठेवण्यासाठी कोस्टर्स केले. साधारण ४"बाय ४" मापाचे तुकडे कापले. माझ्याकडे इतर शिवणाच्या प्रोजेक्टसाठी आणलेले पांढरे आणि काळे कापड होते. त्याचे पण त्याच मापाचे तुकडे अस्तर म्हणून कापले. अस्तर आणि मूळ कापड असे उलट शिवून मग उलटले. कडेने परत शिवले. प्रत्येक २ बाह्यांमधे मिळून ४ कोस्टर्स झाले. कडेने मणी, वरून थोडे धावदोरे टाकून ते सजवले.




पॉट होल्डर्स आणि टेबल रनर - 
कोणत्यातरी कारणासाठी मी साधारण १/२ मीटर कापड विकत आणले होते. त्याचा वापर झालाच नव्हता. म्हणून मग त्याचा वापर करून टेबर रनर (१०" बाय ४०") आणि काही पॉट होल्डर्स (८" बाय ८") केले. त्यात आतमधे मी क्विल्टींगचे बॅटींग (कापसाचा पातळ थर) वापरला आहे.

Friday, December 16, 2011

स्नो फ्लेक्स


ख्रिसमसमध्ये एक मैत्रिण अगदी हौसेने झाड आणते आणि ते सजवते. यावर्षी तिला क्रोशाचे दोन स्नोफ्लेक्स करून पाठवले. त्याचे हे फोटो - 

खालील नमुना कुठे पाहून केला आहे तो मी विसरले आहे. थोडी शोधाशोध करून इथे देईन. 



खालील नमुना इथे पाहून केला आहे - http://yellowpinkandsparkly.blogspot.com/2009/12/snowflake-earrings.html