मी कॉटन कपड्याची खूप मोठी फॅन आहे. बरचसे कपडे कॉटनचेच वापरते. मधे कुर्त्यांची फॅशन होती तेव्हा आवडीने कॉटनचे कापड घेउन ५-६ कुर्ते शिवुन घेतले होते. तसेच काही कुर्ते मैत्रिणीनी दिलेले होते. प्रत्येक कापडामागे थोडी इमोशनल अटॅचमेंट असल्याने वापरुन झाल्यावर टाकून न देता ढीग करुन ठेवले होते. असे १२-१३ कुर्ते, २ कमिझ असे साठवून केलेले हे बेडशीट.
प्रत्येक कुर्ता अगदी हलकी इस्त्री फिरवून घेतला. सगळ्यात लहान मापाच्या कुर्त्यात १६ बाय १६ चा पीस बसत होता. मग १६ बाय १६ चा एक पुठ्ठा कापुन घेतला. सगले कमिझ उलटे परुन त्यावर तो पुठ्ठा ठेउन तुकडे कापले. बटण असणारे २ कुर्ते होते त्याची बटणे कापून टाकली आणि तिथे मशिनने शिवुन घेतले. मोठ्या कमिझमधे ३-४ प्रत्येकी असे तुकडे निघाले. सगळे मिळून २५ तुकडे झाले. ते तुकडे जमिनीवर मांडून एक साधा पॅटर्न करुन घेतला. त्यात फार वेळ घालवला नाही पण अगदी सेम कापड शेजारी येईल असे पाहिले.
आता एक एक कॉलम शिवुन घेतला आणि परत जमिनीवर पसरला. असे सगळे (५) कॉलम तयार झाले की मग ते कॉलम एकमेकाला जोडून शिवून घेतले. त्या शिवणीवर दाब टीप लगेच टाकली.
सगळे शिवल्यावर असे जाणावले क्विन साईझ बेडशिटसाठी लांबीला कापड कमी पडतेय. थोडे तुकडे शिल्लक होते पण सिमेट्री जात होती मग एक रुंदीला लहान असणारी ओरिसा कॉटनची जुनी ओढणी लांबीत कापून दोन्हीकडे जोडली. राहिलेल्या कडा आता दुमडून धेतल्या. असे हे बेडशीट तयार झाले.
माझे बरेच कुर्ते लांब बाहीचे होते, त्या बाह्या उसवून ठेवल्या आहेत. त्याचे उश्यांचे २ अभ्रे होतील असे वाटतेय. ते केले की फोटो टाकेन.